बहुतांश विद्यार्थ्यांना माहित असतात तसे बारावी सायन्सनंतर मला दोनच पर्याय माहित होते. इंजिनीअरिंग आणि मेडिकल. कला क्षेत्रातील काही विषयांशी ओळख झाली होती, आवडही वाटत होती पण त्यात करिअर करू शकू असा आत्मविश्वास वाटत नव्हता. त्यामुळे बारावीनंतर मेडिकल प्रवेश परिक्षा दिली आणि डॉक्टर होण्याची स्वप्न पाहू लागले, पण वैद्यकशास्त्राला (MBBS) प्रवेश मिळण्याकरिता थोडे गुण कमी पडले म्हणून थोडं नाखुशीनेच फ़िजिओथेरपीलं प्रवेश घेतला.

फ़िजिओथेरपी शिकत असताना मला सामाजिक आरोग्य या क्षेत्राविषयी काहीच कल्पना नव्हती आणि पुढे या क्षेत्रात मी शिरकाव करू शकीन याचा मागमूस ही नव्हता. फ़िजिओथेरपी शिकत असताना हॉस्पिटलमधल्या रुग्णांना उपचार देत असताना आणि वैद्यकशास्त्राचे मान मोडून अभ्यास करायला लावणारी पुस्तके वाचताना सतत वाटत होते, की “मला हे आवडते आहे, पण क्लिनिकल प्रॅक्टीसमध्ये अडकून राहायचे नाहीये.” गडचिरोली येथील ‘सर्च’ या संस्थेला जेव्हा सहज म्हणून भेट दिली तेव्हा आपल्याला जे हवे आहे त्याप्रकारचे काम इथे सुरु आहे याची जाणीव झाली होती.

पुढे निर्माण फेलो म्हणून दहा महिने जेव्हा सर्चमध्ये काम केले तेव्हा समाजशास्त्र, मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, संशोधन, लेखन आणि समाजमानसशास्त्र या सगळ्याची सांगड घालत काम करण्यात किती मजा येऊ शकते हे प्रत्यक्ष अनुभवत होते. सामाजिक आरोग्यामध्ये [public health or Social Epidemiology] पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे का असा विचार करत पुण्याला परत आले तेव्हा “म्हणजे नेमकं काय?” या प्रश्नाचा सामना करावा लागेल असं वाटलं नव्हते. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे- आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जवळ-जवळ- प्रत्येक गोष्टीशी, घटनेशी, आणि प्रश्नाशी अगदी जवळचा संबंध असणारं असं हे शास्त्र आणि तरीही बहुतांश विद्यार्थ्यांना अशा कुठल्या क्षेत्रात “स्कोप” असू शकतो हेच मुळी माहित नाही. अमिताभ बच्चनच्या “दो बुंद जिंदगी की” किंवा विद्या बालनच्या “जहां सोच वहां शौचालय” या वाक्याचा सामाजिक आरोग्य या क्षेत्राशी किती जवळचा संबंध आहे हे ही आपल्याला लक्षात येत नाही.

एखाद्या माणसाला मलेरिया झाला तर तो डॉक्टरकडे जाऊन औषध घेतो आणि बरा होतो. एखाद्या बाळाला हगवण झाली तर त्याला रुग्णालयात दाखल केले जाते परंतु मुळातच एखाद्या गावात मलेरियाचे प्रमाण कं आणि किती वाढते आहे, कोणत्या वयोगटातील लोकांमध्ये वाढले आहे, कोणते घटक मुख्यत: त्याला कारणीभूत आहेत आणि गावपातळीवर कोणते उपचार केले की मलेरियाचे प्रमाण कमी होऊ शकते याचा विचार रुग्णाला औषधे देऊन बरा करणारा डॉक्टर प्रत्येक वेळेस करतोच असे नाही. एखाद्या बाळाला हगवण होते तेव्हा आईच्या किंवा त्या बाळाच्या आजूबाजूच्या माणसांच्या कोणत्या सवयीमुळे ती होत आहे का, त्याची त्या आईला पुरेशी जाणीव आणि माहिती आहे का, आणि सवयी बदलण्यासाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार सामाजिक आरोग्यशास्त्रात केला जातो.

एकेकट्या माणसाला गोळ्या औषधे देऊन बरे करणे गरजेचे असतेच परंतु समाजात रोग होऊ नयेत, आरोग्यपूर्ण सवयी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, शहरांमध्ये तसेच गावपातळीवरील विशिष्ट गरजा ओळखून उपचारांच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात आणि जनतेमध्ये आरोग्यशिक्षणाचे बीज रुजावे, ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम केले जाते. यात वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि वेगवेगळ्या प्रकारची कामे करता येऊ शकतात. सेवा, संशोधन, प्रोजेक्ट स्वरूपाचे काम, पॉलिसी अनालिसिस, पॉलिसी बदल अशा कोणत्याही स्वरूपाचे काम करता येते. सेवा आणि संशोधन क्षेत्रात काम करणारे डॉ. अभय आणि राणी बंग यांची सर्च ही संस्था तुम्हाला ऐकून माहित असेल. गडचिरोलीतील अर्भकमृत्यूदर कमी करण्याकरिता ते जवळजवळ ३० वर्षे काम करीत आहेत. युनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, पब्लिक हेल्थ फौंडेशन इंडिया, रेड क्रॉस, बिल एँड मेलिंडा गेट्स फौंडेशन अशा विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था पब्लिक हेल्थ क्षेत्रात प्रोजेक्ट स्वरूपाची कामे करीत असतात. ही प्रोजेक्ट काही महिन्यांची किंवा काही वर्षांची असू शकतात. पब्लिक हेल्थ क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या व्यक्तीस या प्रोजेक्ट मध्ये संशोधक म्हणून, संख्याशास्त्रीय तज्ञ म्हणून (biostatistics expert), पॉलिसीतज्ञ म्हणून किंवा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी असते. याकरिता शासकीय कार्यालये, NGO, थिंक टँक, विद्यापीठांशी संलग्न संस्था यामध्ये काम करता येऊ शकते. काही प्रकल्पांची सोपी उदाहरणे द्यायची तर-

  1. पुण्यातील चिकुनगुन्या या आजाराचे वाढते प्रमाण- कारणे आणि उपाय यांचा अभ्यास
  2. अहमदाबाद येथे उष्माघाताने (heat wave) बळी जाण्याचे प्रमाण तपासणे व त्याकरिता शासनाला प्रणाली आखून देणे
  3. स्वच्छ भारत अभियानाचा गावपातळीवर जाणवलेला परिणाम
  4. मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सोयींचा आढावा आणि उपाय
  5. मातांमधील व त्यांच्या अपत्यांमधील आहार व जीवनशैलीमुळे उद्भवणारी मधुमेहाची शक्यता यांचा दोन दशके केलेला अभ्यास

थोडक्यात काय तर तुम्हाला लोकांबरोबर काम करायला आवडत असेल, समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे तुम्ही सजगपणे बघत असाल, तुम्हाला आरोग्याशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या विषयाचा पाठपुरावा करण्याची आवड असेल तर तुम्हाला हे क्षेत्र आवडू शकतं!

निदान भारतात तरी पब्लिक हेल्थ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याकरिता तुमच्याकडे मेडिकल किंवा पॅरामेडिकलची पदवी असणे गरजेचे आहे. त्यानंतर टी. आय.एस.एस. (Tata Institute of Social Sciences), पुणे विद्यापीठ (Health sciences department), श्री चित्र तिरुनाल सोसायटी (तिरुअनंतपुरम), आय आय पी एच (Indian Institute of Public Health) आणि आय आय एच एम आर (Indian Institute of health management and research) या ठिकाणी तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घेता येते. डॉक्टरेट करण्याकरिता या सर्व ठिकाणी तसेच काही आय आय टी मध्ये संधी आहे. भारताबाहेर शिक्षण घेण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत व त्याकरिता तुम्हाला विद्यापीठाचे फंडिंग मिळू शकते. या विषयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात interdisciplinary कामाला खूप मोठी संधी आहे. मी अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना अभियांत्रिकी आणि आय टी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसोबत काम करीत एक पब्लिक हेल्थ अॅप तयार केले होते.

[

](https://www.facebook.com/search/str/mukta+gundi/keywords_top)या क्षेत्राला मी ‘अमर’ क्षेत्र म्हणेन! बदलती जीवनशैली, नव्याने येणारे संसर्गजन्य रोग, औषधांची कमतरता, खेडी व शहरे यांत वाढणारी विषमता या सगळ्या गोष्टींमुळे दुर्दैवाने आरोग्याच्या समस्या वाढतच जाणार, असे दिसत आहे. त्यामुळे या क्षेत्रात उत्तम संशोधकांची गरज सतत निर्माण होत राहणार आहे. सामाजिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव हळूहळू शासनदरबारी होते आहे त्यामुळे आरोग्यक्षेत्रात काम करण्याच्या संधी वाढत आहेत.

केवळ भारतातच नव्हेत तर जगभरात या क्षेत्रात अतिशय नाविन्यपूर्ण कामे सुरू आहेत. जाणून घ्यायची असतील तर युनिसेफ, WHO, world bank किंवा ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह यांच्या वेबसाईट्स जरूर बघा. सामाजिक आरोग्य क्षेत्रातील कामे तुम्हाला एक वेगळे जग दाखवू शकतात. कामांचा व्याप भारताबाहेरही असू शकतो. या क्षेत्रात नोकर्यांची आणि कामाची मुळीच कमतरता नाही, हे वेगळे सांगायला नको.

हे काम म्हणजे समाजाच्या आरोग्याची नाडीपरीक्षा करण्याचे काम आहे! क्लिनिकल प्रक्टिसच्या पेक्षा काही वेगळे करायचे असेल आणि उत्साहाने, संशोधक वृत्तीने, समाजमानसशास्त्र, समाजशास्त्र, संख्याशास्त्र या वेगवेगळ्या विषयांची मोट बांधून तुम्हाला काम करायचे असेल तर या सामाजिक आरोग्यक्षेत्राचा जरूर विचार करा.