मनोबल १

कधीही नव्हे ते आज मनुष्याला ज्या एका गोष्टीची नितांत गरज आहे ते म्हणजे मनोबल . सध्याची परिस्थिती साऱ्या मानवजातीची कसोटी पाहणारी आहे. कारण मानवाच्या इतिहासात अगदी प्रथमच तो त्याच्या अस्तित्वाची लढाई लढतोय ,अत्यंत निकराने… आज तसे पहिले तर तशी सकृत दर्शनी ज्याला आपण युद्ध म्हणतो , जसे दोन देशातले ,जातीतले ,जमातीतले तसे काहीच नाही . पण तरीही आज पृथ्वीतलावर युद्धजन्य परिस्थिती आहे ..आणि ती एका मानवाने दुसऱ्या मानवावर कुरघोडी करण्याच्या ,वर्चस्व मिळविण्याच्या हव्यासातून निर्माण झाली आहे. म्हणजे आजच्या  या परिस्थितीला मानवच जबाबदार आहे. त्याने  अत्यंत चुकीच्या मूल्यांना , चुकीच्या उद्दिष्टांनी कवटाळण्याचा हा अपेक्षित परिणाम आहे.  जणू त्या नियतीनेच मानवाचे डोळे उघडण्यासाठी केलेली ही अत्यंत निष्ठुर पण अत्यावश्यक अशी योजना आहे. असो … याला आपण काहीही उपमा दिली तरी सत्य हे आहे की ही लढाई आज आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक , कौटुंबिक ,सांघिक आणि सामाजिक अश्या वेगवेगळ्या स्तरांवर एकाचवेळी लढायची आहे. आणि नुसतीच लढायची नसून ती जिंकायची पण आहे. कोणतेही आव्हान जिंकण्यासाठी सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी लागतात त्याम्हणजे

१) मनोबल

२) योग्य व्यूहरचना

३) त्याची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी

यातले सर्वात महत्वाचे म्हणजे मनोबल , जर ते शाबूत असेल तर आणि तरच समोरच्या आव्हानाने मन डगमगून न जाता त्याचा स्वीकार करू शकते, स्वीकार झाल्यावर त्या आव्हानाचे चहू बाजुंनी आकलन व नंतर विश्लेषण करू शकते . आणि हे होऊ शकले तरच  मग पुढचे दोन टप्पे ,योग्य व्यूहरचना व त्याची कठोर अमंलबजावणी आपण गाठू शकतो. आणि हे सातत्याने करत राहिले तर नक्कीच विजय दृष्टीपथात येतो .  पण अश्या अत्यंत अवघड , निकराच्या परिस्थितीमध्ये , जिथे जिवावरचे संकट  अगदी उंबरठ्याशी येऊन पोचलं असताना ,सगळीकडे सामाजिक आणि वैज्ञानिक हतबलता आलेली असताना हे मनोबल टिकवायचे कसे ? वाढवायचे कसे ? याही पेक्षा मनोबल म्हणजे काय ? ते कश्यात असते ? ते ओळखायचे  कसे ? या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याची आज खरी गरज आहे .

खरे म्हणजे याच विषयात आपल्या पूर्वजांनी खूप सखोल आणि सैद्धांतिक काम करून ठेवले आहे. पण  जे जे दुसरे मिळवत आहेत ते ते सर्व आपल्याकडे पण पाहिजे , इतरांपेक्षा आपल्याकडे काहीतरी कमी आहे आणि ते आपण आजच मिळवले पाहिजे किंवा मिळाले पाहिजे ,नाहीतर दुसरा कुणी घेऊन जाईल  या मानसिकतेमुळे, भीतीमुळे सतत कश्याच्या तरी मागे  धावत असल्यामुळेआमचे या अत्यंत मूल्यवान अश्या ठेव्याकडे ,वारश्याकडे आमचे असावे तसे  लक्ष नाही . पण आता सक्तीच्या संचारबंदीमुळे का होईना आणि उंबरठयावर पोचलेल्या जीवघेण्या संकटाला कोणताही चॉईस नसताना सामोरे जायलाच हवे असताना या अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर चिंतन करूयात .जे आपल्यामध्ये आहे त्याचा शोध घेऊ यात .त्या अफाट शक्तीशी जोडले जाऊयात. Bulb doesn’t illuminate unless its connected to energy , electricity. नुसती वीज असून चालत नाही .ती बल्बशी जोडली गेली पाहिजे.  

चला तर मग आपला वेळ छान कारणी लावूयात आणि मनोबलाची उपासना करूयात. सुरुवातीलाच मला अत्यंत नम्रपणे सांगावेसे वाटते की जे इथे बोलले जाणार आहे ते अजिबातच नवीन नाही. कारण हे सिद्धांत आपल्याच पूर्वजांनी त्यांच्या तपस्येतून , स्वानुभवातून सिद्ध केलेले आहेत. जे आपल्या मातीत बीज रूपाने  आहेतच , आपल्या मनाच्या खोल तळाशी पण कुठेतरी कोपऱ्यात ही बीजे आहेतच. पण वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांचा विसर पडल्यासारखा झालाय. पण परदेशात कितीही काळ व्यतीत केला तरी गावाकडच्या मातीची आठवण येताच त्या आठवणींच्या मागे गावच्या मातीचा सुगंध येतो. तसेच या बीजांचे पण आहे. त्यांची मनापासून आठवण जरी झाली तरी ती बीजे रुजायला लागतात आपल्या मनाच्या माती मध्ये. त्यामुळे वाचताना ‘अरे यात काय नवीन आहे ,हे तर मला माहीतच आहे ‘ असे वाटण्याचा नक्कीच संभव आहे. आणि ते खरे सुद्धा असेल. पण आज इथे आज हा विषय मांडताना पुढील उद्देष मनात आहेत.

१)  जसा सूर्योदय रोजच  होतो हे  प्रत्येकाला माहीतच आहे पण ज्या दिवशी आपण अगदी निवांतपणे सूर्योदयाचा सोहळा अनुभवतो त्या दिवशी आत काहीतरी घडते जे आपल्याला समृद्ध करून जाते तसेच या आपल्यातच असलेल्या या शहाणपणाकडे आपल्याला निवांत बघायचे आहे.

२)  या निवांत बघण्याने त्या शहाणपणावर साचलेली  धूळ आपल्याला स्पष्ट दिसेल आणि एकदाका हे घडले की एका क्षणात ही  धूळ उडून जाईल व त्या शहाणपणातले लखलखतेपण आपल्या लक्षात येईल.

३) हे घडले की ते शहाणपण ‘माहित आहे’ च्या स्तरावरून ‘समजण्याच्या ‘ स्तरावर येईल आणि मग ते सहजच जगण्याच्या पातळीवर येईल कारण लखलखतेपण ते कसचेही असो …हवेहवेसे वाटते.

मनोबल : 
कोणत्याही अवघड आव्हानाला  सामोरे जायच्या आधी मनात  ”असेल हे आव्हान खूपच अवघड वा मोठे ,पण माझ्यातल्या इच्छाशक्ती व प्रयत्नांच्यापुढे पुढे ते तोकडे आहे “  असा विचार येणे म्हणजे सार्थ मनोबल असणे होय. मनोबलाने मनात संकल्पाची प्रतिष्ठापना होते. आणि विकल्पाचे उच्चाटन होते. संकल्प म्हणजे जे विचार भविष्यात यश मिळेल अशी आपली खात्री पटवून देतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करता येणे , ध्येयापासून चित्त अजिबात विचलित न होणे, उद्दिष्ट सफल होण्याबद्दल मनात कोणताही ,संदेह ,संशय , नकारात्मकता न येणे व ध्येय सफलतेचेच विचार मनात घोळवणे याला संकल्प म्हणतात. जे विचार मनात यशाबद्दल संदेह ,भीती निर्माण करतात त्यांना विकल्प म्हणतात.

भविष्यात उत्तम यश संपादन करायचे असल्यास उत्तम मनोबलाच्या शक्तीने अढळ संकल्प करता येणे अत्यावश्यक आहे. आज प्रत्येकाला अश्या दृढ संकल्पाची अत्यावश्यकता आहे.

शंतनु गुणे