मनोबल ३

मनोबलाची जाणीव होणे :

कोणत्याही अवघड अश्या परिस्थितीत आपले मनोबल उंचावायचे असल्यास पुढील तीन विचार केले गेले पाहिजेत.

1) मीच जर हार पत्करली तर माझयासाठी माझ्या एवढ्या तळमळीने माझ्याशिवाय माझ्यावरचे हे संकट दूर करायला दुसरा कोण येणार ? तर या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे .कोणी नाही येणार . पण तुम्ही जर खंबीरपणे युद्धाला उभे राहिलात तर नक्की कोणी उभे राहील मदतीला.

2) या परिस्थितीत मीच  हतबल झालो ,मनाने हार पत्करली , तर  पणाला कायकाय लागले आहे? म्हणजे मी कायकाय गमावणार आहे ?

इथे आपण अर्जुनाच्या भूमिकेत येउयात . कोणत्याही योध्दयाला कोणत्याही प्रकारच्या युद्धात सहज हरवू शकणारे सामर्थ्य असताना , श्रीकृष्णा सारखा गुरु ,सखा सारथी असताना देखील अर्जुन हतबल झाला. असहाय्य झाला. जरी मी हे युद्ध जिंकले तरी त्याने मला काय मिळणार ? इतके पराकोटीचे विचार यायला लागले. आणि अतिसामर्थ्यवान असे गांडीव धनुष्य त्याने खाली ठेवले . इतिहास जर असाच पुढे गेला असता , म्हणजे श्रीकृष्णाने गीता सांगितली नसती आणि अर्जुनाचे मन पालटले नसते तर काय झाले असते?

ज्या कपट कारस्थानांनी कौरवांनी जेते पद मिळवले तोच मार्ग योग्य असा अखिल मानवजातीचा विश्वास बसला झाला असता. अनाचार , अनैतिकता , प्रतिष्ठित आणि प्रस्थापित झाली असती . म्हणजेच साऱ्या मानवजातीने सत्याचा ,मूल्यांचा , चारित्र्याचा पायाच गमावला असता. मनुष्य रूपात राक्षस निर्माण झाला असता. मानव जातीने सर्वस्व गमावले असते.

आज पण वेगळी परिस्थिती नाही. आज जर आपण हतबल ,निराश झालो आणि संकल्प नाही करू शकलो तर युद्धात न उभे राहताच आपण सर्वस्व गमावू. आणि हे इथेच थांबत नाही . आपण इतरांनाही त्यांची काहीही चूक नसताना ,अपराध नसताना सर्वस्व गमवायला भाग पडू. जान है तो जहां है . मी आहे तर जग आहे. ज्या जगाचा, ज्या जगण्याचा आजपर्यंत आम्ही मनमुराद आनंद घेतला आहे तो तसाच घेत राहायचा असेल तर संकल्पाशिवाय पर्याय नाही. माझ्या विचारांतून माझे जग उभे राहते. मीच नसेन तर माझे असे म्हणून काय असेल ? मीच नसेन तर आमचे म्हणून काय असेल ? मीच नसेन तर वसुधैव कुटुंबकम या शब्दांना काय अर्थ असेल ?

पण संकल्प करून जर मी मनोबलाच्या साहाय्याने हे युद्ध जिंकू शकलो तर पुढच्या अनेक पिढयांना माझा हा पराक्रम अभिमानाने सांगता येईल . एवढेच नव्हे , जसे  अर्जुनाच्या ,पांडवांच्या पराक्रमाने सत्याची प्रतिष्ठापना केली तशी आपल्या या पराक्रमाने मानवी मूल्यांची , संकल्पाची ,संयमाची , मनोबलाची प्रतिष्ठापना होईल .जी आपल्या अनेक पुढील पिढ्यांना मार्गदर्शक , प्रेरणा दायी असेल.

3) या आव्हानाला तोंड देण्यासाठी माझ्याकडे कायकाय शस्त्र आहेत, अस्त्र आहेत ,मंत्र आहेत?

मी आहे म्हणूनच माझ्यासाठी हे जग आहे. माझ्या आधी जरी हे होते आणि माझ्यानंतरही जरी हे असणार आहे तरी आत्ता याक्षणी मात्र मी आहे म्हणूनच माझ्यासाठी हे जग आहे. माझ्यातल्या मन नावाच्या उपकरणामुळेच मी या जगाचा अनुभव ,आनंद आणि अभ्यास करू शकतो.  हे सत्य स्वीकारणे म्हणजे  मनोबलाकडे नेणाऱ्या महामार्गावर पहिले पाऊल टाकणे होय. हे सत्य स्वीकारणे म्हणजे  भूत-वर्तमान -आणि भविष्य या तिन्ही काळात माझे मन अत्यंत लीलया संचार करू शकते हे वास्तव स्वीकारणे. त्याच बरोबर ज्या मनाच्या सामर्थ्याने मनुष्याने आपल्या भवतालच्या सृष्टीचा ,निसर्गाचा शोध घेत ज्ञानाची ,विज्ञानाची ,कलांची असंख्य दालने उघडली  तेच मन माझ्याही कडे आहे हे सत्य स्वीकारणे होय. आणि सर्वात महत्वाचा सिद्धांत म्हणजे  आपल्या पूर्वजांना ‘को हं ?’ मी कोण? हा जो अतिशय मूलगामी प्रश्न पडला तोही याच मनाच्या साहाय्याने पडला आणि याचे उत्तर ‘सो हं ‘म्हणजे ‘मीच ते ब्रह्म आहे , या विश्वाला चालविणारी ,सूर्यापासून मिळणारी ती ऊर्जा म्हणजे मीच आहे’ हे उत्तरही आपल्या पूर्वजांना याच मन:सामर्थ्याच्या साहाय्याने मिळवता आले. याचीच दुसरी बाजू म्हणजे “ ईश्यावास्य इदं सर्वम “ साऱ्या चराचरात त्या ईश्वराचा वास आहे म्हणजेच माझ्यातही त्या सर्वव्यापी ईश्वराचा अंश ,वास आहे.

शंतनु गुणे