मनोबल -२

जशी उत्तम फलंदाजाला एखादी साधी चूक पण अत्यंत महागात पडते आणि त्याची विकेट जाते, शतकी खेळीचे स्वप्न उध्वस्त होते ,तशी आज आपल्याला एखादी साधीशी चूक पण अत्यंत महागात पडू शकते. फलंदाजाला दुसरा डाव तरी असतो , इथे तीही संधी मिळेल की नाही माहित नाही.मनोबलाचा संबंध व्यक्तीच्या जवळ असलेल्या कौशल्याशी , त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाशी असलाच पाहिजे असे नाही. म्हणजे आपण असा अर्थ नक्कीच काढू शकत नाही की ज्याच्याकडे कौशल्य ,ज्ञान जास्त , शारीरिक ,आर्थिक ,बौद्धिक सामर्थ्य जास्त त्याचे मनोबल जास्त . अजिबातच नाही. मनोबल ही खूपच वेगळी गोष्ट आहे. याचा संबंध ज्ञान , कौशल्य ,सामर्थ्य यांच्याशी नसतो तर ते उद्दिष्टाशी ,ध्येयाशी आणि तत्वांशी असतो.जेव्हा अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली माणसे आपल्या ध्येयावरच्या वा तत्वांवरच्या असीम प्रेमामुळे असामान्य कामगिरी करतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी असामान्य मनोबल प्रकट झालेले असते. शिवाजी महाराज , स्वातंत्र्यवीर सावरकर ,नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा सध्याच्या जमान्यातले नारायण मूर्ती ,सुधा मूर्ती, पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले अशी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येतात. पण मग आता अत्यंत नेहमीचा प्रश्न “ हो बरोबर आहे , ती माणसे होतीच मोठी , त्यांच्या समोर होती खूप मोठी उद्दिष्टे , पण आमचे काय ? आम्ही तर सर्वसामान्य , मग आमच्याकडे कडे कुठून आणि कसे येणार हे मनोबल या सध्याच्या परिस्थितीचे आव्हान पेलायला ?”वादाच्या सोयीसाठी एकवेळ आपण मान्य करूयात तुमचा मुद्दा . पण मग आपण काही वेगळी ,अगदी नेहमीच्या जीवनातली आव्हाने घेऊ .आमच्या एका मित्राला मस्तपैकी मधुमेह आहे पण तो म्हणतो “जेवणानंतर काही गोड खाल्याशिवाय मला जेवण झाल्यासारखंच वाटत नाही”. आमच्या एका अतिशय जवळच्या मित्राला त्याच्या आजारपणात डॉक्टरांनी अगदी फक्त वीस पावले चालायला सांगितली होती ,याने पण खूप फरक पडेल म्हणून . पण पठ्या नाही तर नाही चालला एकही पाऊल . आमच्या एका मैत्रिणीला वैद्यांनी सकाळी एक काढा घ्यायला सांगितला पण तिने त्यांना स्पष्टच सांगून टाकले की हे जमणार नाही . अत्यंत उत्तम तयारी होऊन सुद्धा स्पर्धे आधी , परीक्षे आधी, किंवा स्वतःला सिद्धकरण्याच्या कोणत्याही क्षणाच्या आधी छातीत धडधड होणे ,नर्व्हस होणे , यशाची खात्री न वाटणे ही सारी मनोबल कमी पडणे याचीच लक्षणे आहेत.जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की ‘कळतंय पण वळत नाही ‘ तेव्हा तेव्हा समजावे की आपले मनोबल कमी पडते आहे.इथेच तर काम करायचे आहे . आपण सर्वसामान्य आहोत या दृष्टिकोनालाच तोडून मोडून टाकायचे आहे. पार नामशेष करून टाकायचे आहे त्याला कारण हा दृष्टिकोनच मुळी सर्वात चुकीचा आहे. हा दृष्टिकोन मनुष्याला हतबल करतो. असहाय्य करून टाकतो. हा दृष्टिकोन मनुष्याला परिस्थितीला तोंड द्यायला ,तीवर मात करायला विविध पर्याय आहेत ,असू शकतात या शक्यतेलाच पुसून टाकतो. आणि त्यामुळेच तो अत्यंत घातक आहे.त्याही पुढे जाऊन म्हणायचे झाले तर देवाने काही सर्वसामान्य व असामान्य अश्या दोन जमाती निर्माण केलेल्या नाहीत की मनोबलाचे वाटप काही पूर्वग्रहाने केलेले नाही. ते प्रत्येकाकडेच पुरेपूर आहे . आपल्या आयुष्यातल्या सर्व आव्हानांवर मग ती कोणत्याही क्षेत्रातली असोत व कोणत्याही स्तरावरची असोत त्या सर्वावर मात करून आपले साध्य साध्य करण्याकरिता लागणारे मनोबल प्रत्येक माणसाकडे आहे. प्रथम फक्त त्याची जाणीव होणे, नंतर त्याकडे जायची वाट सापडवणे , त्याचा अनुभव घेऊन मग त्यावर नितांत श्रद्धा बसणे ,हे टप्पे पार केले की मग आयुष्याच्या प्रवासास मजेने निघणे व त्या प्रवासाचा आनंद घेत समृद्ध होणे व व ती समृद्धी भरभरून वाटणे याच गोष्टी उरतात.परम पूज्य विमलताई ठकार यांचे एक वचन इथे फारच उद्बोधक ठरेल. “Center of all social, economical and political problem lies in human consciousness”

शंतनु गुणे