इंजिनियरींग , मेडिकल , प्राध्यापक , पत्रकारीता , असे सगळे पर्याय एकीकडे आणि शास्त्रीय गायनात करियर एक वेगळी दिशा, वेगळ जग. कुठल्याही क्षेत्रात करियर करायच असल्यास त्या क्षेत्रातली शिक्षण व्यवस्था (विद्यार्थी दशा) अत्यंत महत्वाची मानली जाते आणि याला शास्त्रीय गायनाच करियरही अपवाद नाही. महाविद्यालये , संगीत विद्यालये कितीही असली तरी शास्त्रीय गायनात करियर करण्यासाठी “ गुरुशिष्य परंपरेला” ,  त्याचा पाया असण्याला पर्याय नाही. खरेतर शास्त्रीय गायनातील करियर विषयी बोलताना गुरुकुल पद्धती , गुरुशिष्य परंपरे विषयी बोलणे क्रमप्राप्त आहे.

गुरुशिष्य परंपरा 

भारतीय शास्त्रीय गायन (दक्षिण भारतीय/ उत्तर भारतीय) हे आज जगभरात प्रसिद्ध / झाले आहे. त्याचे खरे कारण येथील गुरुशिष्य परंपराच म्हणता येईल. अब्दुल करीम ख़ाँ , सवई गंधर्व, पं भीमसेन जोशी , भास्करबुवा बखले – बालगंधर्व अगदीच आताचं उदाहरण म्हणजे पं. भीमसेन- आनंद भाटे असे अनेक गुरु आणि शिष्य त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे जगभरात प्रसिद्ध झाले.

गुरुगृही राहून गुरूच्या सहवासात गुरुमुखातून गाण्याची तालीम घेणे इतकाच मर्यादित अर्थ नक्कीच गुरुकुल पद्धतीचा नाही. गुरूच्या सहवासामुळे शिष्यात एक व्यक्ती म्हणून होणाऱ्या बदलांवर गुरूची निर्णय क्षमता , समाजातील एक व्यक्ती म्हणून असलेले स्थान , गुरुचे आचार विचार या सगळ्यांचाच प्रभाव असतो. याचाच परिणाम शास्त्रीय गायनातील करियर वर होतो.

आजकालच्या धावत्या युगात गुरुगृही राहून शिक्षण आणि गुरूलाही पूर्णवेळ शिष्याला देणे शक्य नाही. मात्र विज्ञानामुळे शिकण्याचे आणि शिकवण्याचे पर्यायाने करियर चे अनेक मार्ग उप्लब्ध झाले आहेत. गुरुकडून योग्य मार्गदर्शन असल्यास ( कुठल्याही प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम आणि सादरीकरण याचा योग्य मेळ घालून मिळालेले मार्गदर्शन) कुठल्याही करियरचे अनेक पर्याय खुले  होतात.

एक गोष्ट मात्र नमूद करावी लागेल की शास्त्रीय गायन क्षेत्रातलं करियर करण्यासाठी फक्त अभ्यासक्रमाची हुशारी असून काम होत नाही. संयम , सातत्त्य , समर्पण आणि सतत नवीन काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा हवी. योग्य गुरुकडून योग्य वेळी मिळालेली शास्त्रशुद्ध तालीम, रियाजाचं सातत्य , योग्य वेळी संधी मिळण्यासाठी राखलेला संयम आणि कलेप्रती आपली निष्ठा किंवा समर्पित भाव हीच शास्त्रीय गायनातील गुरुकिल्ली आहे असे म्हणता येईल.

शास्त्रीय गायनाची उत्तम तालीम देणाऱ्या काही  भारतीय / परदेशी संस्था

  1. ITC संगीत रिसर्च,कोलकाता
  2. श्रुतीनंदन , कोलकाता
  3. ललित कला केंद्र ,पुणे
  4. आवर्तन – गुरुकुल, पुणे
  5. पं जसराज फाऊनडेशन,USA

वरील सर्व संस्थांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची अभिजात गुरुकुल पद्धती आणि विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम यांचा उत्तम मेळ साधला आहे.

पूर्ण वेळ शास्त्रीय गायक कलाकार

कुठलाही योग्य तालीम घेतलेला गायक या करियरचे स्वप्न उराशी बाळगून असतो आणि त्या दिशेने मेहेनत घेत असतो. हे जरी खरे असले तरी पूर्ण वेळ शास्त्रीय गायक कलाकार म्हणून नावारूपास येणे हे या सर्व करियर पर्यायांमध्ये सर्वात कठीण आणि दुर्मिळ असा पर्याय आहे, मात्र परिश्रम , जिद्द , चिकाटी, उत्तम तालीम अनेक तास रियाज , अधिकवेळ सादरीकरणाची क्षमता , नाविन्य त्याचप्रमाणे आजच्या युगात क्रमप्राप्त असे मार्केटिंग स्कील या मुळे हे करियर होऊ शकते, तसेच पूर्णवेळ गायकासाठी असलेले मानधनही आज भरपूर मिळते.

मात्र यात प्रामुख्याने  गुरूची घराणेदार तालीम , त्यावर केलेला विचार आणि आजच्या घडीला लागणारे मार्केटिंगचे सर्व पर्याय आजमावणे क्रमप्राप्त आहे.

पूर्वीच्या तुलनेत कार्यक्रमाची संख्या आता खूप वाढली आहे, प्रत्येक सण , समारंभ हा शास्त्रीय गायन ऐकून साजरी करण्याची पद्धत रूढ होत आहे. आणि गायक कलाकारांसाठी खूप मोठी संधी आहे. चांगली तालीम असेल तर अनेक नवनवीन प्रयोग गायक सादरीकरणात करू शकतात, त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त होऊ शकते. मात्र जसे या करियर चे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. खूप कार्यक्रम सतत घडत असल्यामुळे स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आणि कुठल्याही क्षेत्रात प्रमाणापेक्षा अधिक स्पर्धा वाढली की त्याचा दर्जा घसरू शकतो. अधिक स्पर्धेमुळे गायकाला नुसत्या तालमीवर किवा उत्तम सादरीकरण यावर भागवत नाही. त्यांना स्वतःचे मार्केटिंग करणे क्रमप्राप्त ठरते. यात कार्यक्रम करणाऱ्यांच्या (आयोजकांच्या) सतत संपर्कात राहणे, स्वतःची स्वतःच खर्च करून ध्वनीमुद्रिका काढणे, स्वतःच्या बातम्या प्रसिद्ध करणे, स्वतःची जाहिरात ज्या ज्या माध्यमातून करता येईल त्या त्या माध्यमाचा वापर करणे. मात्र हे सगळ करताना स्वतःच्या रियाझाकडे, गायकीकडे गायकाचे दुर्लक्ष होऊ शकते.

मात्र वारील सर्व काम करणारी व्यक्ती त्या गायका व्यातिरिक्त , दुसरी कोणी असेल तर मात्र हा करियर पर्याय सर्वोत्तम आहे असे म्हणायला हरकत नाही,

गुरु / संगीत अध्यापक

सर्वप्रथम ‘गुरु’ या संज्ञेबद्दल बोलूयात. गुरु ही संज्ञा अत्यंत व्यापक आणि श्रेष्ठ आहे. खरे सांगायचे झाल्यास पूर्वीची गुरुकुल पद्धती आणि या गुरुकुलात वास्तव्य करणारे ऋषितुल्य गुरु आणि आजची करियर शोधक गुरु ही संज्ञा यांची तुलनाच होऊ शकत नाही. गुरु म्हणजे ज्याच्या सहवासात कलातर प्राप्त होतेच पण कलेव्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून एक समाजातील व्यक्ती म्हणून आणि शिष्याचं पूर्ण आयुष्य ज्याच्या सहवासामुळे तेजोमय होऊन जात तो गुरु. कदाचित गुरूच्या प्रत्यक्ष शिकवण्यामुळे जेवढं शिकायला मिळत नसेल तेवढं त्याच्या सहवासात राहून शिकायला मिळत तो गुरु. आजच्या युगात असे गुरुचे व्यक्तिमत्व लाभणे आणि तेही योग्य वेळी लाभणे हे अहो भाग्यच!

गायन क्षेत्रातील करियरसाठी उत्तम तालीम झालेली असेल ती कोणीही व्यक्ती हा पर्याय निवडू शकते , मात्र शिकवणे हे एक नवीन आव्हान या करियर मधे असते.

एखाद्या / स्वतःच्या संगीत अकादमी मध्ये गुरु म्हणून कार्य करताना प्रत्येक वयातील शिष्यांना विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देणे, विद्यार्थ्यांमध्ये गायनाची गोडी रुजवणे तसेच तो/ ती विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ गायन शिकेल अश्या दृष्टीने अभ्यासक्रमाची दिशा ठरवणे अशी अनेक आव्हाने आहेत. स्वतःच्या विद्यालयात गुरु म्हणून कार्य करताना शिकवण्यातील नाविन्य, विद्यार्थ्याची मानसिकता, पालकांची मानसिकता आजच्या काळाची गरज आणि योग्य तालीम देणे या सगळ्याचा समतोल राखणे आवश्यक असते.

मात्र या करियर पर्यायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण घेतलेल्या तालीमेचा पुरेपूर वापर शिकवताना करता येतो, निर्णय स्वातंत्र्य असते स्वतःचा रियाझही सुरु ठेवता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्थीक समतोल. त्यातील सातत्य कायम असते कारण या सगळ्या गोष्टीचे नियोजन गुरूच्या हाती असते

संगीत अध्यापक / व्याख्याता / प्रोफेसर

सध्याच्या विद्यापीठीय नियमांनुसार BA, MA (MUSIC) झाल्यानंतर NET ही स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्वाची परीक्षा पास करून या करियर पर्यायाकडे वळता येऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत सर्वात जास्त, नियमित आर्थिक स्थैर्य देणारा आणि वरील दोन्ही पर्यायांच्या तुलनेत सोपा असणारा पर्याय आहे. १२ वी कोणत्याही शाखेत पास झाल्यानंतर BA, MA पदवी घेतल्या नंतर NET या परीक्षेस पात्र होता येते. NET ही स्पर्धा परीक्षांमधील एक महत्वाचा टप्पा असून NET पास होण्याकरिता मात्र नियोजनबद्ध अभ्यासच हे यश देऊ शकते.

BA आणि MA मधील अभ्यासक्रम तसेच संगीतातील इतर व्याख्या, जीवनपट, कार्य, शास्त्रीय उत्तरे यांचा अभ्यास जर चांगला असेल आणि विद्यार्थ्यांचे general knowledge वर विशेष भर असेल तर ही परीक्षा अवघड नाही. यात पेपर-I, general knowledge असतो तर पेपर ३ हे संगीतावर आधारित असतात. ही परीक्षा पास झाल्यांनतर भारतातील कुठल्याही विद्यापीठात संगीत व्याख्याता म्हणून करियर करता येऊ शकते, या पदासाठी आजच्या काळात लाख रुपये, शासनाचा अनुदानित पगार मिळतो

साथीदार शास्त्रीय गायक

पुन्हा एकदा, उत्तम तालीम मिळालेली असेल तर शास्त्रीय गायन हे क्षेत्र खूप व्यापक होऊ शकतं. जशी जशी कलाकाराची कला वृद्धिंगत होते तसे तसे त्याचा कलेचा परिघ वाढायला लागतो . आणि याचाच एक लक्षण म्हणजे कथक सारख्या नृत्य प्रकाराला / उपशास्त्रीय गायनाची साथ करणे.

आपल्याला मिळालेल्या तालीमेमध्ये, शिक्षणामध्ये, सदरीकरणात नृत्याला हवे तसे नाविन्य, बदल करून गायनाची साथ करणे ही मुख्य जबाबदारी यात गायकावर असते.

कथक नृत्य शास्त्रीय / उपशास्त्रीय गायनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा गायनातील हावभाव, शब्द , आलापी आणि नाविन्यतेचा नृत्याला उपयोगच होतो, मात्र आपल्या गायन साथीमुळे नृत्याचा आविष्कार अधिक रंजक झाला पाहिजे ही त्या गायकाची जबाबदारी असते. यासाठी नर्तीकेबारोबर सराव करणे, नृत्याला काय अपेक्षित आहे हे समजून घेणे हे गायकाचे कर्तव्य बनते.या करियर मध्ये सतत सराव विविध प्रकारच्या अर्थाच्या बंदिशी, ठुमऱ्या यांचा साठा गायकाकडे असावा लागत

विविध शाळांमध्ये संगीत शिक्षक

सध्याच्या काळात संगीत शिक्षक हा सर्वात जास्त प्रचलित झालेला करिअरचा पर्याय आहे आणि संगितातील पदवी घेतलेल्यांनी या पर्यायाचा सर्वात जास्त वापर केलेला आढळतो . संगीतातील कुठलीही पदवी यामध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीत विशारद तसेच अलंकार, कोणत्याही विद्यापीठातून प्राप्त झालेली संगीतातील पदवी (BA) अथवा (MA) यातील कुठलीही पात्रता लागू आहे.

कुठलाही संगीत शिक्षक हा संगीताच्या बाबतीत परिपूर्ण असावा लागतो. त्याला अष्टपैलू म्हणता येईल. स्वतःची शास्त्रीय संगीताची तालीम कशा प्रकारे वापरता येईल याचे कौशल्य संगीत शिक्षकाकडे असायला हवे. शाळांमध्ये संगीताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून संगीताच्या तासिकेत शिकवायचे, विद्यार्थ्यांच्या कलेने संगीताचा रंजकपणा अधिक  कसा वाढवायचा , विविध शालेय स्तरातील स्पर्धांमध्ये भाग घेणे, गायन शिकवणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे यासारखी आणि अनेक कौशल्ये या पर्यायात अंतर्भाव होतो.

[

](https://www.facebook.com/ashish.ranade2) वरील सर्व पर्यायांचा विचार केला तरी संगीत / शास्त्रीय गायन हे क्षेत्र लोकाभिमुख, लोकांशी अधिक संपर्कात येणारे असल्याने रसिकांना काय ऐकणे अपेक्षित आहे, याचाही विचार करणे प्राप्त असते. आपल्याला मिळालेली अभिजात गायकीची घराणेदार तालीम आणि रसिकाग्रह यांचा मेळ घालून स्वतःची गायकी, स्वतःचे करियर घडवता येऊ शकते. त्याचप्रमाणे ही कला लोकाभिमुख असल्याने जनसंपर्क, विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संबंध, सांगीतिक विचारांची देवाणघेवाण, प्रत्यक्ष कार्यक्रमाचा अनुभव, स्वतःचा शिष्यवर्ग, रसिकवर्ग या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे.

आशिष रानडे.