अनेक गैरसमजुतींचे, चुकीच्या दृष्टिकोनाचे गुलाम झालेल्या आपल्या सर्व शक्तिशाली मनाला परत राज्य पदावर बसवायचे असेल तर प्रथम पराक्रमी राजाचा दृष्टिकोन निर्माण करता आला पाहीजे. कारण

“जसा दृष्टिकोन,तशी गरज.जशी गरज ,तसा विचार. जसा विचार, तशी कृती. जशी कृती, तसा परिणाम !”

हा मुलभूत सिद्धांत आहे. त्यामुळे असा दृष्टिकोन निर्माण झाला तरच आपले मन पराक्रमी राजासारखे विचार करायला सुरुवात करेल. ते तसा विचार करू लागले तरच तशी कृती आपल्या कडून होईल आणि हळू हळू आपले मन‘सार्वभौम राजा’होईल. मगच Live Life King Size हे शब्द प्रत्यक्षात येतील.

पण हा सिद्धांत प्रत्यक्ष अंमलात आणायचा कसा ? इतक्या वर्षांचे उन पावसाळे झेलत. सिमेंट-कॉन्क्रीट सारखा घट्ट झालेला आपला दृष्टिकोन बदलायचा कसा ?पण कोणतेही युद्ध जिंकायचे असेल तर आधी ते आपल्या मनात जिंकावे लागते हा सिद्धांत आहे. मग ते अगदी आपल्याच मनात ठाण मांडून बसला असलेल्या चुकीच्या दृष्टिकोनाबरोबरका असेना ! हे मनातले युद्ध कसे जिंकणार ? मनात ही ताकद कुठून येणार?

गुलामाला झालेल्या गुलामीची प्रखर जाणीवेतूनच ती ताकद येणार. शिवाजी राजांना जिजाऊ मातेच्या संस्कारांमुळे ही प्रखर जाणीव वयाच्या सोळाव्या वर्षी झाली. ती त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवत स्वराज्याची मुहूर्तमेढ आधी त्यांच्या मनांमध्ये केली. त्यातून स्वराज्याचा महासंग्राम उभा राहिला. म्हणून राजांना भारतीय अस्मितेचा जनक म्हणतात. मंगल पांडे , झाशीची राणी , वासुदेव बळवंत ,लोकमान्य टिळकांसारख्या अनेकांनी त्यावेळच्या निद्रिस्त समाजमनाला आपल्या प्रखर कृतींनी आणि वाणीने ही जाणीव करून दिली आणि त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीचा पाया रचला गेला. म्हणून ही व्यक्तिमत्वे अजरामर झाली.महात्मा फुले,कर्व्यांनी शतकानुशतके भरडल्या गेलेल्या स्त्री मनाला गुलामीची जाणीव करून दिली आणि त्यातून आजच्या कल्पना चावला – सिंधुताई सपकाळ निर्माण झाल्या. दलितांच्या मनात ही जाणीव बाबासाहेबांनी निर्माण केली.आणि त्या ठिणगी मधून दलितांचा विद्येचा ज्ञानयज्ञ सुरु झाला.

पण आता कुणीतरी मसीहा आपल्याला आपल्या मानसिक ,बौद्धिक गुलामीच्या जोखडातून मुक्त करेल अश्या आशेवर त्याची वाट बघणे निरर्थक आहे. आता हे काम आपलेच आपल्याला करायचे आहे .आपल्या मनाचा जागर यासाठीच करायचा आहे.

ज्याची जशी खिडकी तसा आकाशाचा आकार ,
कुणाला गवसतो कवडसा ,तर कुणाला गवसते निराकार!
दुसऱ्याच्या प्रकाशातस्वत:ची वाट सापडत नाही .
छोट्याश्या खिडकीमधून आकाशाची अथांगता मावत नाही.
उसन्या श्वासांवर धगधगतं जीवन जगता येत नाही.
वांझोट्या अवसानाने स्वत:चा प्रकाश निर्माण करता येत नाही.
हे जर घडवायचं असेल तर बनावं लागतं
स्वत:च वात, स्वत:च तेल आणि स्वत:च प्रकाश,
आतल्या दृष्टीने निर्माण करावं लागतं
स्वत:च असे एक खास आकाश 

तेव्हा एकदा ही जाणीव झाल्यावर गुलामगिरी स्वीकारायची की राज्यपद उपभोगायचे हे दोन Options आपल्या समोर येतील . आणि त्यातून कुणाची तरी एकाची निवड करावीच लागेल. ही निवड करताना मनाची द्विधावस्था होणार. ही कशी दूर करणार? कारण गुलामी स्वीकारण्यात Comfort Zone ला अजिबात धक्का लागणार नसतो.पण बदलणार पण काहीच नसते. पण गुलामीचे साखळदंड तोडण्यात Comfort Zone पूर्णपणे उध्वस्त होणार असतो. सारेच बदलणार असते. अश्या अनोळखी पण आव्हानात्मक जगात पाउल टाकायला निर्भयता लागते  ती कुठून आणि कशी आणणार ? ही द्विधावस्था दूर करत निर्भयता आणण्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गाकडे , सृष्टीकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहूयात का?

“निसर्गाला कंटाळा शिळेपण, नैराश्यमाहित नाही. कारण निसर्गातला प्रत्येक घटक सजीव व निर्जीव , आपल्या वाट्याला आलेली भूमिका अगदी मनापासून आणि आनंदाने बजावतो. तिथे माणसासारखे पाटी टाकणे, चालढकल करणे ,निराश होणे बिलकुल नाही. त्याच्या शब्दकोषात पराभव,अपयश हे शब्दच नाहीत. म्हणजे जरी वादळात आंब्याच्या झाडाचा सर्व मोहोर गळून पडला तरी ती एक केवळ नैसर्गिक घटना असते. या पराभवाचा कोणताही नकारात्मक परिणाम आंब्याच्या मानसिकतेवर होत नाही त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षी परत तो बहरणारच आहे. महापुरात नदीकाठावरचे रान संपूर्ण उध्वस्त होते तरी वर्षभरात ते रान परत पहिल्यासारखे दिमाखाने उभे राहते. रणरणत्या उन्हाने पक्षांची तहान भागविणारी सारे पाणवठे कोरडेठाक झाले तरी कोणतीही तक्रार न करता हे पक्षी हजारो मैलांचे अंतर पार करत नवीन पाणवठ्याचा शोध घेत आपला जीव वाचवतात. आपला वंश वाढविण्यासाठी साल्मन मासे प्रवाहाच्या विरुद्ध शेकडो मैल पोहत आपल्या जन्म स्थळी जातात. याचा अर्थ अगदी मुंगी पासून महाकाय देवमाश्यापर्यंत आणि लव्हाळ्या पासून वटवृक्षा पर्यंत,निसर्गातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या जिवाकडे कोणत्याही आव्हानांना स्वीकारायची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांवर मात करायची अमर्याद जिद्द असते.

त्याच प्रमाणे निसर्गा सारखा कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी साऱ्या विश्वात कुणीच नाही.त्याच्यासारखे रसरशीत आणि चैतन्यमय कुणीच नाही. त्याच्यासारखा दाता कुणीच नाही.कोणतीही अपेक्षा ने ठेवता, उपदेशाचे डोस न पाजता,अगदीसहज पण अत्यंत प्रेमाने आपल्या प्रत्यक्ष कृतीतून तो या जगाला अखंड ज्ञानाचा आणि रिसोर्सेसचा पुरवठा करत आहे.ज्यांनी त्याच्याकडे ज्ञान मागितले त्यांना ज्ञान मिळाले. ज्यांनी विज्ञान मागितले त्यांना विज्ञान मिळाले.ज्यांनी अन्न मागितले त्यांना अन्न मिळाले. ज्यांनी रिसोर्सेस मागितले त्यांना रिसोर्सेस मिळाले. आज जेजे मानवनिर्मित आहे तेते सर्व मिळवता येण्यामागे निसर्गातले हे ज्ञान आणि विज्ञानच कारणीभूत आहे. त्याच्या शिवाय माणूस शून्य आहे.

अश्या सर्वगुणसंपन्न आणि सर्वव्याप्त निसर्गाला ‘खरा गुरु’ असे आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने आपण मानतोय का ? त्याच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे आपण म्हणतो पण त्याच्याकडून खरेच आपण काही शिकतोय का ? तो आदर्श आहे असे आपण म्हणतो पण त्याच्या ठायी प्रतीत होणारे गुण आपल्यात यावे असे मनापासून प्रयत्न करतोय का ? त्याच्यातल्या गुणांची पूजा करतोय का ?

कर्तृत्वसंपन्न व आनंदी जगण्याच्या वाटचालीमध्ये मनाच्या गुलामीची प्रखर जाणीव होणे हे जसे पहिले महत्वाचे पाउल तसेच ही जाणीव झाल्यावर आपला दृष्टिकोन योग्य करण्यासाठी निसर्गाला गुरु करणे आणि त्याचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवणे हे दुसरे महत्वाचे पाउल. ही दोन पावले जर उचलली गेली तर तिसरे पाउल तुम्हाला तुमच्या comfort zone च्या बाहेर Thrilling and Challenging Zone च्या दिशेने पडेल हे नक्की !

निसर्गाला गुरु करायचे म्हणजे नेमके काय करायचे ते पुढच्या सोमवारी पाहू.

शंतनु