आपला स्वभाव ही आपल्या वागण्याची मर्यादा बनते. त्यामुळे आपण अनेक अडचणी ओढवून घेत असतो. आपल्याला समाजात वावरायचे असते. त्याचे नीतिनियम असतात. अनाहूतपणे आपल्याकडून त्यांचे उल्लंघन व्हायला लागते. मग आपल्याला टीकेला तोंड द्यावे लागते, तेवढ्यावर भागले तर ठीकच आहे. पण काही वेळा अतिशय गंभीर परिणाम भोगण्याची पाळी येते. त्यामुळे केव्हा स्वभावाला मुरड घालायची आणि केव्हा त्याला मोकळे सोडायचे ते ठरवून वागायचे शहाणपण जोपासणे गरजेचे आहे.

हा स्वभाव बनतो कसा? आपण ज्या परिस्थितीत जन्माला येतो आणि नंतरही राहत असतो त्यातून आपल्यावर संस्कार होत असतात. त्यातले आपण कोणते स्वीकारतो आणि कोणते नाकारतो त्यावरून आपला स्वभाव घडत जातो. बालपणात आई-वडील आणि गुरुजनांनी संस्कार चांगले व्हावेत याची काळजी घ्यायची असते. पण तेव्हासुद्धा कोणते संस्कार स्वीकारायचे ते आपणच ठरवत असतो. म्हणून तर एकाच घरात वाढलेल्या व्यक्तींचा स्वभाव अगदी भिन्न असू शकतो. स्वभावो दुरतिक्रमः अशी म्हण आहे. त्याचा अर्थ असा लावला जातो की मनुष्य-स्वभाव बदलता येत नाही. पण तो अर्थ बरोबर नाही. स्वभाव आपल्या वागण्याचे नियंत्रण करतो, त्यापेक्षा वेगळे वागणे अवघड असते असा त्याचा अर्थ आहे. जन्मभर स्वभाव घडतच राहतो. तो कसा घडवायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते, पण आपण त्याचा वापर करीत नाही. स्वभाव घडवायची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या व्यक्तीची असते. पण त्याची काळजी घेतली जात नाही, कारण स्वभाव घडवायला आणि नियंत्रित करायला निग्रहाची गरज असते.

विराट कोहली हा सध्याचा जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे आणि धोनीनंतर भारतीय क्रिकेट संघाची धुरा त्यालाच पेलावी लागणार आहे. तो स्वभावाने तापट आहे आणि पंचांच्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्याबद्दल त्याला शिक्षाही झालेली आहे. एका अशा शिक्षेच्या वेळी मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की ‘कोहलीचा आक्रमक स्वभावच त्याला उत्तम खेळाडू आणि यशस्वी कप्तान बनवणार आहे. त्यामुळे त्याच्यावर जी टीका होत आहे ती अनाठायी आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?’ मी म्हटले की “त्याची गुणवत्ता त्याला उत्तम खेळाडू बनविल आणि त्याने ती काळजीपूर्वक जोपासायला हवी. पण कप्तान म्हणून यशस्वी बनण्यासाठी त्याने या आक्रमकतेला मुरड घालून आपले वागणे सुधारणे शहाणपणाचे ठरेल. मैदानावर वागण्याचे काही नियम असतात. ते प्रत्येक खेळाडूने पाळायलाच हवेत. उद्या अशा वागण्याने त्याने काही सामन्यांची बंदी आपल्यावर ओढवून घेतली तर त्याचे वैयक्तिकच नव्हे तर संघाचे सुद्धा नुकसान होऊ शकते.’ सध्या तरी विराटने असा शहाणपणा जोपासलेला दिसतो.

आपला स्वभाव कसा आहे आणि कसा असायला हवा ते जाणून घेण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असते. असे आत्मपरीक्षण नियमित करीत राहण्याची सवय लावून घ्यायला हवी. यासाठी रोजनिशी लिहिणे फारच उपयुक्त ठरते. आपले लक्ष कशावर आहे, ते प्रलोभनांकडे खेचले जात आहे का, आपले प्रतिसाद योग्य येत आहेत का हे सारे बारकाईने तपासत राहायला हवे. मग नको असलेले विचार आणि विकार आपल्या मनाचा आणि बुद्धीचा ताबा घेत आहेत का, तेही निरीक्षण करून ठरवायला हवे. नंतर निग्रहाने हवे असलेले विचार मनात घोळवणे आणि विकारांवर ताबा मिळवणे तसेच आपले लक्ष नियंत्रित करणे साधायला लागते. आणि स्वभावात आवश्यक तो बदल घडायला लागतो. आपले वाचन, संगत आणि प्रतिसाद हेही नियंत्रणाखाली असायला हवेत. म्हणजे मग आपल्या ज्ञानाला, कौशल्याला झळाळी यायला लागते. एकाग्रता सहज साधायला लागते. हातून उत्तम कार्य घडायला लागते.

आपले अंतरंगातले भावच आपल्या प्रगतीच्या आड येत असतात. ते तसे येऊ नयेत म्हणून ते भाव बदलण्यासाठी जे मानसिक तप करायचे असते त्याला योगात “भावन’ असे म्हटले आहे. आपण ठरवलेले विचार मनात घोळवून तशी कृती करीत असताना मनात विरोधी विचार येत राहतात. कारण आपला स्वभाव बदल स्वीकारायला तयार नसतो. अशा विरोधी विचारांना ‘वितर्क’ असे म्हटले आहे. असे वितर्क मनात उभे राहायला लागले तर त्याला बळी न पडता आपल्याच मनाशी वाद घालायचा असतो. ऐन परीक्षेच्या वेळी आपली तयारी पुरेशी झालेली नाही, काही आठवले नाही तर काय होईल, असे नकारात्मक विचार मनात यायला लागतात. महत्त्वाचा सामना खेळायचा असेल त्या वेळीही असे होऊ शकते. त्या वेळेला माझी स्मृती चांगली आहे. मी जेवढा अभ्यास केला आहे त्याच्यावरचे प्रश्न तरी मी उत्तम सोडवू शकेन, माझा खेळ उत्तम आहे, फक्त एकाग्रता साधली की मला चांगले खेळता येईल, असे विचार पुन्हा पुन्हा घोळवून मनाला पटवून द्यायचे असते. न्यायालयात दोन वकील परस्परविरुद्ध गोष्टी न्यायाधीशासमोर मांडत असतात. जो वकील आपले म्हणणे न्यायाधीशाला पटवून देईल त्याच्या बाजूने निकाल दिला जातो. तसेच हे आहे. आपल्याच मनाची एक बाजू आपल्याला हे जमणार नाही, असे धरून बसलेली असते. मनाच्या ज्या बाजूला प्रगतीची-उत्तम कार्याची ओढ असेल त्या बाजूची शक्ती आपण वाढवायची असते. मनच न्यायाधीशाचे काम करून निर्णय देत असते. आपण सरावाने तो निर्णय आपल्याला हवा तसा करू शकतो. सातत्याने यशस्वी व्हायचे असेल तर स्वभावावरच नियंत्रण हवे .त्याला दुसरा पर्याय नाही. हे नियंत्रण मात्र कठोर आत्मपरीक्षणाने आणि सतत केलेल्या अभ्यासानेच साधते.

भीष्मराज बाम

(लेखक योग आणि मानसशास्त्र अभ्यासक आहे.)
(bpbam.nasik@gmail.com)

(दिव्यमराठी वृत्तपत्राच्या सौजन्याने)