कधी कधी असा एक विचित्र प्रश्न बऱ्याचदा सगळयांना पडतो, आपल्याला ‘मन’ नसते तर? मन बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळे पैलू जर मानवी मनाला नसते तर काय झाले असते? उत्तर अगदी सोपं आहे. असं झालं असत तर पशुप्रमाणे आला दिवस,गेला दिवस असे निवांत जगता आले असते आणि मनुष्य पशु पातळीवरच राहिला असता. पण ते विध्यात्याला मंजूर नव्हते. त्याला सर्वांग सुंदर अशी कलाकृती घडवायची होती. म्हणून त्यानी माणुस घडविला आणि त्यात अंतःकरण नावाचे अद्भुत यंत्र बसविले. बाहेरच्या जीवनाशी व्यक्तीच्या आंतरिक जीवनाचा मेळ घालणे हे अंतःकरणाचे मुख्य काम. पण जसे उत्तम यंत्र देखभाल करून उत्तम ठेवावे लागते तसेच आपल्या मनाची देखभाल करून ते जागरूक आणि कर्यक्षम ठेवावे लागते. नुसता तानपुरा असून चालत नाही तर तो सुरेल,जवारीदार लावावापण लागतो. तरच त्यातला स्वयंभू गांधार ऐकू येतो. तसेच देवाने दिलेले हे अंतःकरण सजग, सकारात्मक आणि शुद्ध ठेवावे लागते.तरच जीवनाशी सुंदर मेळ घातला जाऊन जगण्याचे मधुर संगीत निर्माण होते.

गेली अनेक वर्ष ‘जागर मनाचा’ मार्फत सुस्तावलेले मन सजग करण्यासाठी, कोमेजलेले आणि थकलेले मन ताजेतवाने करण्यासाठी, निराश मनात आशेची ज्योत लावण्यासाठी, आपले जीवन कर्तुत्वसंपन्न आणि आनंदी करण्यासाठी मी कार्यरत आहे. त्यातूनच आलेले अनुभव आणि आत्तापर्यंतच्या प्रवासात जाणलेले शहाणपण याचा उपयोग ज्यांच्या मनात जिज्ञासा आहे,स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची धमक आहे आणि ज्यांना आपला दुष्टीकोन बदलण्याची गरज वाटते आहे पण ती कशी हे कळत नाहीये अशांना व्हावा म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप. आत्तापर्यंत बऱ्याचवेळा वृत्तपत्र आणि मासिकांमधून मी लिहित आलो आहे. आता बदलत्या काळात हे एक नवीन माध्यम!

प्रत्येकाला आपले जीवन आनंदी आणि समृद्ध व्हावे असे वाटत असते आणि असे जीवन प्रत्येकाच्या वाट्याला येउपण शकते. परंतु असे हे जीवन सकारात्मक आणि जागरूक मनाचा अविष्कार असते ही अत्यंत महत्वाची गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. ‘जागर मनाचा’ ह्या सदरात वाचकांना हा कर्तुत्ववान आणि आनंदी जगण्याचा अविष्कार कसा अनुभवायचा हे समजेल… हा सुंदर अविष्कार जो मी अनुभवला तो तुम्हीपण अनुभवू शकता..तो कसा हेच माझ्या blog मधून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न! इथून पुढचा प्रत्येक सोमवार ..

एवढं मात्र नक्की, ह्या प्रवासात स्वतःच वात स्वतःच तेल आणि स्वतःच उर्जा बनण्याशिवाय पर्याय नाही!

भेटू पुढच्या सोमवारी …तुमच्या मनातील प्रश्न किंवा प्रतिक्रिया (नाकारात्मकसुद्धा) जाणून घ्यायला उत्सुक!