अंगणातल्या बोधी वृक्षाखाली, म्हणजेच माझ्या आवडत्या आंब्याच्या झाडाखाली निवांत बसून सळसळत्या पानांतून सततबदलतअसणाऱ्या आकाशाच्या नक्षीकडेबघत बसणे हा माझा खूप आवडीचा छंद . त्या पानांचा अडथळा पार करून माझ्या पर्यंत पोचायचा अथक प्रयत्न करणारी  सूर्याची किरणे तर माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय. एखादाच क्षण त्या किरणांचा सुंदरसा कवडसा माझ्या पर्यंत पोचतो, जरा कुठे स्थिरावतो तेवढ्यात त्या इवल्याश्या पानांच्या जराश्या हालचालीने त्यांचा प्रवास खंडित होतो. आणिअसे गवसलेले हरवण्याचाहाखेळ सतत चाललेला असून देखील मी कधी हिरमुसलेला ,निराश झालेला सूर्याचाकिरण पाहिलेला नाही ! तुम्ही पाहिलाय कधी? कोण देत असेल यांना प्रेरणा ? कोण करत असेल यांना inspire ?

किरणांचा हा खेळ चालू असतानाच पलीकडून नाजूक चिवचिवाट ऐकू येतो. माझे लक्ष तिकडे जाते .पाहतो तर काय , चिमणी पेक्षाही दोन लहान पक्षी ,गांडूळ खताच्या लोखंडी पिंजऱ्याच्या छोट्याश्या जाळीतून आतली गांडुळे अथवा किडे टिपायचा अथक प्रयत्न करत आहेत.मी त्यांच्या अविश्रांत धडपडीला एकटक पाहत होतो.जवळजवळ तासाभराच्या अविरत कष्टानंतर त्यांना एखादे किडूकमिडूक गवसायचे . कधी ते निसटून जायचे .कधीकधी दुसराच पक्षी त्यांचा तोंडचा घास पळवून न्यायचा. पण परत तोच अनुभव की त्या दोन चिमण्या जीवांना मी कधी frustrate झालेले वा डिप्रेशनमध्ये गेलेले पाहिले नाही. तुम्ही पाहिले आहे कधी ? यांच्यासाठीचा Motivation प्रोग्राम  पाहिलाय तुम्ही कधी? कोणदेत असेल यांना प्रेरणा ? कोण करत असेल यांना inspire ?

एवढ्यात डोळ्यासमोर एक अद्भुत घडले. माझ्या पलीकडे असलेल्या जरा मोकळ्या मैदानात एका घारीने झडप घालून एका छोट्या सापाच्या पिल्लाला चोचीत टिपूनक्षणार्धात आकाशाचा वेध घेतला. केवढे विलक्षण कौशल्य ! काय ती नजर , काय ती विद्युल्लतेसारखी चपळाई आणि तो झपाटा ! मनात आले कोणत्या ट्रेनिंग प्रोग्रामला जाऊन तिने हे कौशल्य विकसित केले असेल ? तुम्ही पाहिलाय कधी घारीचा ,गरुडाचा ट्रेनिंग प्रोग्राम ?

निसर्गातल्या प्रत्येक छोट्या व अजस्त्र जीवाला असे काहीतरी अचाट कौशल्य, वैशिष्ट्य मिळालेले आहे. आणि यांच्या सहाय्यानेच त्यांनी या लाखो वर्षांच्या जीवन संघर्षात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे .नुसतेच टिकवून ठेवले नाही तर विकसित पण होत आहेत.मग प्रश्न असे आहेत की कोणत्याही formal ट्रेनिंग शिवाय ,शाळे शिवाय , गुरुं शिवाय, समुपदेकाशिवाय या सर्व जीवांचे कधीच ,काहीच का अडत नाही ? का हे सर्व जीव आपले आपले जीवन मजेत ,बिनबोभाट जगू शकतात ? आपल्या मध्ये असलेल्या गुणांची ओळख यांना कोण करून देते ? आणि त्या गुणांचा विकास ते कसा करतात ? आणि या पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाचा प्रश्न असा की जर मनुष्य ही जर निसर्गाची सर्वात अद्वितीय अशी निर्मिती आहे तर अश्या सर्वगुणसंपन्न मनुष्याला का पदोपदी मानसिक,बौद्धिक,भावनिक आधाराची ,सहाय्याची गरज लागते ? का त्याचे व्यक्तिमत्व सुजाण,कर्तृत्ववान आणि आनंदी व्हावे यासाठी आज अब्जावधी रुपये खर्च करावी लागत आहेत ? हजारो संसाधने वापरावी लागत आहेत ? का माणसाला त्याचे माणुसपण ओळखता यावे , माणूसपणजगता यावे यासाठी इतके सर्वव्यापी प्रयत्न करावे लागत आहेत ? आणि एवढे होत असूनही का खरीखुरी आनंदी आणि कर्तृत्ववान माणसे आज दुर्मिळ होत चालली आहेत ?

जगाचे जाऊ द्यात. तुमचे काय ? आरश्यासमोर उभे राहून , तुमच्याच डोळ्याला डोळा भिडवून ,छातीवर हात ठेवून , तुमच्या दैवताशी प्रामाणिक राहून तुम्ही ठाम पणे सांगू शकता की ‘होय, मी आनंदी आहे !’‘होय, माझ्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी मी अहोरात्र झटतो आहे !’‘होय, माझ्यावर माझे डोळस प्रेम आहे !’ बघा प्रयत्न करून .खूप अवघड जाईल . आपण दुसऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो पण स्वत:च्या नजरेला नजर देऊन खोटे बोलू शकत नाही. का बरे असे होते? माणुस ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती असूनसुद्धा आजआपण असमाधानी का आहोत ? का आपण तणावपूर्णतेत जगत आहोत? का आमची नाती आनंददायी नाहीयेत ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे का आमच्यामनावर विश्वासापेक्षा भीतीचा पगडा जास्त आहे? का आम्ही आत्मविश्वासाने ,निर्भयतेने जीवनाला सामोरे जाऊ शकत नाही?

भेटूच पुढच्या सोमवारी ..ह्या सगळ्या प्रश्नांचं एकेमेव उत्तर काय आहे हे जाणून घेण्यासाठी..

शंतनु