गुलामाला गुलामीची प्रखरतेने जाणीव होणे

हेच राज्याभिषेकाकडे नेणारे पहिले पण अत्यंत महत्वाचे पाउल असते.

शुभप्रभात ! काय मग, आपण ‘गुलाम’ की ‘राजा’ ह्याचं उत्तरं मिळालं?

रोज सकाळी ऑफिसला, कॉलेजला, शाळेत जाण्याआधी आपण सगळे जण नक्कीच आरशात स्वतःला बघतो. आपण आज छान, कर्तुत्ववान, आनंदी दिसतोय ना हे एकदा confirm करून मगच आपल्या सगळ्यांचा दिवस सुरु होतो. पण आपण ‘दिसतोय’ की खरच तसे आहोत हा पुन्हा ‘गुलाम’ की ‘राजा’ ह्यावर अवलंबून आहे. आता पुढचे दोन सोमवार कोणत्या चुकीच्या समजुतीमुळे सर्वसामान्य माणूस गुलाम होतो, हे पाहूयात !

खाली ४ वेगवेगळे आरसे दिले आहेत. हे आरसे म्हणजे माणसाच्या मनावर राज्य करत असलेल्या चार चुकीच्या समजुती

  1. ‘आपल्यात काहीतरी कमी आहे’
  2. ‘आपण नेहमीच जिंकणार आहोत’.
  3. ‘I am not happy because of you.’
  4. ‘मीच(सर्वात चांगला/ली. सारे करतो/ते.केले पाहिजे, सारे निभावून नेतो/ते) तरी……..

ज्यातले प्रतिबिंब तुम्हाला ओळखीचे वाटेल तो आरसा तुम्हाला तुमच्या मनाच्या गुलामीचे खरे स्वरूप आणि कारण सांगेल.

१.‘आपल्यात काहीतरी कमी आहे!

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक सुशिक्षित पालक आले. वडिलांचा स्वत:चा व्यवसाय आणिआई प्रोफेसर. त्यांची तक्रार अशी होती की त्यांचा एकुलता एक मुलगा, वय वर्षे २८, दिसायला छान गोरापान,शरीरयष्टी उत्तम. कॉमर्सची डिग्री आहे. बँकेची परीक्षा उत्तमरित्या पास झाला आहे. पण तो आज काही म्हणजे काहीही करत नाही. त्याला काहीही करावेसे वाटत नाही आणि आपल्याला काही करता येऊ शकेल हा आत्मविश्वासपण त्याच्यात निर्माण झालेला नाही. दिवसभर आपल्या रूम मध्ये झोपून असतो.त्यानेच निर्माण केलेल्या ‘आपल्याला काहीही जमणार नाही’ या नकारात्मक विचारांच्या चक्रव्युहात तो पूर्णपणे अडकला आहे. त्याच्याशी बोलल्यावर मला दोन गोष्टी कळल्या. पहिली म्हणजे त्याला मनापासून यातून बाहेर पडायचे आहे.पण कसे ते त्याला कळत नाहीये. आणि दुसरी म्हणजे जर त्याला तो रस्ता लवकर सापडला नाही तर त्याचा अभिमन्यू होणार हे निश्चित.

त्याच्या पालकांशी गप्पा मारत असताना कळले की तो लहानपणी एक छान नॉर्मल मुलगा होता. पण त्याला जेव्हा पक्के दात आले तेव्हा ते सशासारखे, थोडेसेपुढे आले. आणि नकळत तो घरात ,शाळेत,मित्रांमध्ये थट्टेचा विषय झाला.आणि या नाजूक क्षणी घरातून जो सपोर्ट मिळायला पाहिजे होता तो सपोर्ट,पालक त्यांच्या जीवन संघर्षात व्यस्त असल्यामुळे आणि आजोबा जमदग्नीचा अवतार असल्यामुळे नाही मिळाला. याचा परिणाम म्हणजे त्याचे मित्रांमध्ये जाणे थांबले. हसणे थांबले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यात काही एक मोठी कमतरता आहे असा अत्यंत चुकीचा समज त्याच्या मनात रुजला.पुढे  शिक्षणात त्याला सायन्स नीट जमले नाही.आणि घरात सगळे सायन्सचे पदवीधर . त्यामुळे इतर शाखा म्हणजे कस्पटासमान. घरातून त्याला समजून घेण्या ऐवजी “तुला एवढे कसे जमत नाही” असा पाढा .मग त्याने धरली कॉमर्सची वाट. पण यात त्याच्या आत्मविश्वासाची आणि आत्मसन्मानाची पण लागली वाट. यामुळे त्याचे शक्तिशाली मन ‘आपल्याला काहीच जमत नाही आणि जमणारही नाही’ या गैर समजुतीचे ‘गुलाम’ झाले. विश्वासाऐवजी भीती निर्माण झाली. स्वत: बद्दलच्याप्रेमा ऐवजी तिरस्कार निर्माण झाला. त्याच्यातला Performer झाकोळला गेला.
ही झाली एक टोकाची केस. पण आपल्यात काहीतरी कमी आहे , आपण कुठेतरी कमी पडतों आहोत ह्या भावनेने आज बरेच लोक ग्रस्त आहेत. त्यांच्या मध्ये उत्तम क्षमता आहे. गुणवत्ता आहे पण आत्मविश्वासाचा अभाव आहे. अश्यांचे कर्तृत्व बहरून येत नाही.आणि मग यातून ‘आपल्याला अपेक्षित यश नाही मिळाले तर लोक काय म्हणतील? ‘यश नक्की मिळेल ना ? आपले काम ,ज्ञान लोकांना पसंत पडेल ना? आपला निर्णय बरोबर आहे ना ?  हे जग आपल्याला accept करेल ना ? अश्या विचारांनी त्यांचे मन ग्रासून जाते. ‘गुलाम’होते. नीट बघा . हा आरसा तुमचे तर प्रतिबिंब नाही ना ?

२.‘आपण नेहमीच जिंकणार आहोत’.

एक अत्यंत उमदा मुलगा त्याच्या आई बरोबर आला होता.आईचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होते. मी मुलाकडे नीट निरखून पहिले.आणि एक गोष्ट मला जाणवली की या देखण्या मुलाचे डोळे पार विझलेले आहेत. आई माझ्याशी बोलू लागली. “ संदीपने नुकतीच बारावीची exam दिली. पण he is not sure whether he will be able to clear it or not. कारण त्याने अजिबात अभ्यास केला नाही. का केला नाही ? तर त्याच्या मते कष्ट करून काही साध्य होत नाही .” मी चमकलो. आईपुढे बोलू लागली. “त्याचे असे झाले की संदीप दहावीपर्यंत National लेव्हलचा स्विमर होता. स्विमिंग वर त्याचे निरतिशय प्रेम होते .त्यासाठी तो अहोरात्र कष्ट पण घ्यायचा. त्याचे कोच पण छान होते. त्यामुळे तो स्पर्धेत उतरला आणि त्याला मेडल मिळाले नाही असे कधीच झाले नाही. हुशार असल्या मुळे थोड्या अभ्यासाने देखील तो Top करायचा. आम्ही बिल्डर.पैशाची कमतरता नाही. त्यामुळे त्याचे असे लाड पण भरपूर व्हायचे. त्याला आम्ही कधीच कशालाच नाही म्हणालो नाही. पण दहावीच्या आधी एका स्पर्धेत डाईव्ह मारताना त्याच्या मणक्याला धक्का लागला. सर्जरी करावी लागली. त्यामुळे तो मेडलला आणि दहावीच्या परीक्षेला मुकला. त्याचे सर्व मित्र पुढे गेले. त्याचा कोणताही दोष नसून त्याला मिळालेला हा नकाराचा,पराभवाचा धक्का तो अजून पचवू शकलेला नाही. त्यातून तो काही केल्या बाहेरच येत नाही. एवढे कष्ट करून जर मला यश नाही मिळाले तर आता मी काहीच करणार नाही असे त्याचे म्हणणे.” माझ्या मनात आले कीअनेक वर्षे स्पर्धात्मक खेळ खेळत असून सुद्धा हा खऱ्या अर्थाने खिलाडू खेळाडू झालाच नाही.

हल्ली nuclear Families मुळे आणि एकुलत्या एक मुलांमुळे हा प्रश्न खूप दिसून येतो. यशापयशाला समाज आणि कुटुंबीय अतोनात महत्व देत असल्याने हे घडत आहे. अपयशाकडे खिलाडू वृत्तीने पहाणे संपत चालले आहे. त्यातून मुलांना भरभरून द्यायचे. त्यांच्या चुका सतत पोटात घालायच्या.बाहेरच्या जगातल्या संघर्षाची कोणतीही जाणीव आपल्या मुलांना न होऊ द्यायची. अशी मुले मोठी झाल्यावर आयुष्यातला एखादा नकार , एखादा पराभव पचवू शकत नाहीत. कारण आतापर्यंत त्यांचा अहंकार नको इतका पोसला गेलेलाअसतो. त्यांचे मन अहंकाराचे गुलाम झालेले असते. असे मन एकतरअत्यंत भेकड असते कारण अहंकार हा मुळातच भेकड असतो. तो फक्त अनुकूल परिस्थितीच स्वीकारू शकतो. प्रतिकूलता आणि पराभव होण्याची साधी शक्यता जरी दिसली तरी तो यापासून तो दूर पळतो.किंवा अश्या मनाला शहाणपण शिकायचेच नसते .कारण आधी पोसल्या गेलेल्या अहंकारामुळे मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही असा भाव तयार होतो. आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बऱ्याच पुरुषांना आपण प्रॉब्लेम मध्ये आहोत हे कबुल करायला, मदत मागायला ,आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही किंवा येत नाही हे मान्य करायला, चूक कबुल करायला खूप अवघड जाते.
दोन भिन्न चुकीच्या समजुती .पण परिणाम एकच. मन गुलाम !

 

तुमचे मन काय करते ? प्रतिकूलते पासून, पराभवाच्या शक्यतेपासून , लोक काय म्हणतील या भीतीपासून , निर्णय घेण्यापासून दूर पळते की या कशाची परवा न करता सर्वस्व पणाला लावून वादळ वाऱ्यात आपल्या उद्दिष्टामागे खंबीर पणे उभे राहते. पराभवातून तुमच्या मनाला काही शिकावेसे वाटते की त्याच्याकडे उद्दामपणे दुर्लक्ष करते ?तुम्ही प्रांजळ आहात की ढोंगी?

काय सांगतो आहे हा आरसा तुम्हाला ?

शंतनु