मागच्या सोमवारपासून मी एका वेगळ्या पण महत्वाच्या विषयाला ह्या blog च्या माध्यमातून सुरुवात केली. बऱ्याच जणांनी माझ्यापर्यंत प्रतिक्रिया पण पोहोचवल्या. त्या वाचून मनात एक समाधान निर्माण झालं की “जागर मनाचा’ विषय इतरांनासुद्धा तेवढाच महत्वाचा वाटतो आहे. चला तर मग आजच्या blog मधून तुम्ही स्वतःला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात!
या प्रश्नांच्या मुळाशी जायचे म्हणजे दृष्टी आत वळवून आपल्याच अथांग मनाच्या तळाशी  ओथंबून असलेल्या शहाणपणाकडे जायचे आणि त्या शहाणपणातून साऱ्या सृष्टी कडे पहायचे. मग हळूहळू सारे सहज उमजायला लागते. दिसायला लागते. तुमची दृष्टी आत वळली तर तुम्हालाही उमजेल .दिसायला लागेल.

 

माणूस सोडून सृष्टीतल्या प्रत्येक प्राणीमात्राला जन्मदात्यांच्या प्रारंभिक आश्रयानंतर सगळा जीवनसंघर्ष एकट्यालाच करावा लागतो. प्रत्येक कठीण परिस्थितीत त्याचे निर्णय त्यालाच घ्यावे लागतात. हे तर तुम्हाला मान्य आहे ना? मग हे निर्णय कोण घेते तर त्याचे ‘स्वतंत्र मन’ घेते. आणि माणसाचे मन ? ते गुलाम आहे की स्वतंत्र ? हे समजून घेतले तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .

खरे तर ‘मन’ नावाच्या सामर्थ्यशाली उपकरणामुळे माणुस हा इतर प्राण्यांच्या पेक्षा अनेक अर्थाने वेगळा आहे. ‘मना’ मुळेच तो समस्त प्राणीमात्रात सर्वोत्तम होऊ शकतो. ‘माणुस’ होऊ शकतो .पण देवाच्या  वरदानात नेहमी एक मेख ठेवली असते. तो सगळे काही सरळ देत नाही. अर्धे देतो. आणि अर्धे माणसाच्या जिज्ञासेवर , त्याला शोधायला ठेवून देतो.  ‘अंत:करण’ – ‘आतले उपकरण’ ‘मन’ दिले . पण ‘आत’ पहायची इच्छा त्याने माणसावर सोडली. त्याने स्मृती दिली. बुध्दी दिली . पण तिचा वापर कसा आणि कशासाठी करायचा हे त्याने माणसावर सोडले. त्याने भावनांचे सूर निर्माण केले .पण त्यातून संगीत निर्माण करण्याचे ज्ञान राखून ठेवले. थोडक्यात ‘मन’ नावाचे सामर्थ्यशाली उपकरण देवाने माणसाला दिले पण त्याचे सामर्थ्य नेमके कशात आहे आणि ते कसे वापरायचे ,कशासाठी वापरायचे हे ज्ञान राखून ठेवले. आणि माणसाला जर हे कळलेच नाही तर हे महाशक्तिशाली मन एकदम अगतिक होऊन जाते. गुलाम होऊन जाते. आणि एकदाकी असे झाले की ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती एक सर्वसाधारण आयुष्य जगू लागते. जिथे रसरशीत कर्तृत्वाचे आनंदी संगीत उमलायला पाहिजे तिथे कंटाळवाणी असमाधानी खरखर निर्माण होते.

तुमचे मन गुलाम आहे की स्वतंत्र आहे हे या गोष्टीवरून लगेच स्पष्ट होईल. “ एका गावात आपल्या वडिलांबरोबर एक चुणचुणीत मुलगा बाजारातून जात असतो. तेवढ्यात त्याला  काही शिपाई एका माणसाला मध्ये ठेवून चौकीकडे चाललेले दिसतात. असे दृष्य तो प्रथमच पहात असतो. तो कुतुहुलाने वडिलांना विचारतो की “का ते शिपाई चारही बाजुंनी त्याला घेरून घेऊन जात आहेत?” वडील उत्तर देतात “तो माणुस ‘गुलाम’ आहे म्हणून त्याला ते शिपाई चौकीवर नेत आहेत.” मुलाचे समाधान होते. असेच दोन चौक पुढे गेल्यावर मुलाला परत असेच दृष्य दिसते की एक माणूस चालला आहे आणि त्याच्या चारही बाजूने शिपाई आहेत. तो लगेच वडिलांना म्हणतो “बाबा , हा पहा दुसरा ‘गुलाम’.” बाबा त्याला एकदम हटकतात आणि म्हणतात “हळू बोल .कुणी ऐकले तर ते शिपाई आपल्यालाच पकडतील. अरे, तो माणुस गुलाम  नाही,तो ‘राजा’ आहे.” पण मुलाला काही पटत नाही. तो बाबांना हळूच आवाजात विचारतो “मगाशी सुद्धा त्या माणसाच्या चारही बाजुंनी शिपाई होते तेव्हा तुम्ही म्हणालात की हा माणुस गुलाम आहे. पण आता मात्र म्हणता आहात की हा माणुस राजा आहे. याचा अर्थ काय?” बाबा हसतात आणि म्हणतात “पहिला जो माणुस होता तो त्या शिपायांच्या ताब्यात होता. त्याला स्वत:च्या मनाने काहीच करता येणार नव्हते.. त्या शिपायांचे त्या माणसावर संपूर्ण नियंत्रण होतं. म्हणून तो गुलाम होता. पण हा जो दुसरा माणुस आहे त्याच्या ताब्यात शिपाई आहेत. या शिपायांवर त्या माणसाचे नियंत्रण आहे. म्हणून तो राजा आहे.” हे  शिपाई म्हणजे चुकीच्या समजुती- सवयी ,प्रतिकूल परिस्थिती ,फुटके नशीब, न आवरता येण्यासारख्या भावना , अमाप वाढलेला अहंकार आणि इंद्रियांचे चोचले.

आता तुम्ही शांत मनाने विचार करून मला सांगा की तुमचे मन या शिपायांच्या ताब्यात आहे की हे शिपाई तुमच्या मनाच्या ताब्यात आहेत ? या शिपायांच्या नियंत्रणाखाली तुमचे मन आहे की या शिपायांवर तुमच्या मनाचे नियंत्रण आहे ? तुमचे मन गुलाम आहे की राजा आहे ?

सत्य हे आहे की माणुस कितीही शिकला, कमावता झाला तरी तो खऱ्या अर्थाने त्याचे मन स्वतंत्र नसते.  त्याला आपल्या भावनिक, बौद्धिक गुलामीची जाणीवही नसते बऱ्याच वेळेस . आणि अश्या गुलाम मनाने , गुलाम मानसिकतेने सार्वभौम जीवनाला योग्य प्रतिसाद देता येत नाही .व त्यामुळे व फक्त त्यामुळेच आमचे जीवन बहरून येत नाही. आम्हाला आनंदी ,समाधानी, कर्तृत्ववान जगता येत नाही. क्षमता असूनही performer बनता येत नाही.

आपल्याला हवे तसे आनंदी ,कर्तृत्ववान होण्यासाठी , आपल्या क्षमतांना न्याय देत, ताठ मानेने जगता येण्यासाठी या सामर्थ्यवान मनाला या शिपायांच्या  ताब्यात जाऊ न देता या शिपायांवर राज्य करता आले पाहिजे. असे घडले तर आणि तरच प्रत्येक माणुस ही खऱ्या अर्थाने निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती होईल आणि प्रत्येक माणसाचे जगणे सर्वांगाने बहरून येईल. हे अशक्य नाही. अवघडही नाही. फक्त दृष्टी ‘आत’ वळण्याची गरज आहे.

या सामर्थ्यशाली मनाला राजा करून ,त्याच्या कडून उत्तम राज्य करून घेण्याची अमर्याद ताकद माणसाची आहे हे माणसाला समजले तर या जगातून ‘अशक्य’ ‘असमाधान’ ‘असफलता’ ‘अविश्वास’ ‘भीती’ या नकारात्मक भावना कायमच्या निघून जातील. आणि ‘आनंद’ ‘ आत्मविश्वास’ ‘समृद्धी’ ‘आरोग्य’ आणि ‘कृतज्ञता’ या सकारात्मक भावना उमलून येतील. कर्तृत्वाचे संगीत होईल. नात्यांची मैफिल होईल.जगण्याची आनंद यात्रा होईल. जन्माचे सार्थक होईल.’

काय करणार ना मग संकल्प मनाला सामर्थ्यशाली राजा करण्याचा?

शंतनु